अन्वय हे पुस्तक लेखक सु.श्री पांढरीपांडे यांनी वेळोवेळी लिहिलेल्या काही निवडक लेखांचा संग्रह आहे. यातील बहुतेक लेखावर गांधी व विनोबा यांच्या विचारांची गडद छाया पसरलेली आढळते. या संग्रहातील पहिल्या तीन लेखात भांडवली व्यवस्था, साम्यवाद, लोकशाही, विज्ञान - तंत्रज्ञान, विकास इत्यादींचा सामाजिक परिस्थितीवर होणार्या परिणामांचे विश्लेषण आहे. पुढील दोन लेख गांधी, टागोर व मानवेंद्र रॉय यांच्या वैचारिकतेविषयी आहेत. गांधी व विनोबांचे तत्वज्ञानच आजच्या संकटमय परिस्थितीत आपले मार्गदर्शन करू शकते, असा दृढविश्वास लेखक शेवटच्या चार लेखातून व्यक्त करतात. सुरेंद्र बारलिंगे यांच्या प्रस्तावनेत अन्वय वाचून त्याना आलेल्या प्रत्ययाची मांडणी आहे.
प्रबोधनाशी संबंधित पहिल्या तीन लेखांचा आवाका फार मोठा आहे. सारी मानवजात एका कल्पांताच्या कड्यावर उभी असून, येवू घातलेल्या गंभीर परिस्थितीची जाणीव नसल्यामुळे अंधारात चाचपडत आहे, असे लेखकाला वाटते. आल्विन टॉफ्लरच्या थर्ड वेव्ह या पुस्तकाचा हवाला देऊन पांढरीपांडे म्हणतात की, विचाराच्या व व्यवहाराच्या पातळीवर जागतिक परिस्थितीने आव्हान उभे केले आहे व आजचे विचारवंत याकडे पुरेशा गांभीर्याने बघत नाहीत. संपूर्ण मानवजातीवर कोसळलेल्या संकटांच्या मुळाशी आपण अंगीकारलेली जीवनशैली असून ही संकटे आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनाचा कब्जा घेत आहेत. चुकीच्या भांडवली व्यवस्थेच्या चौकटीतच आपण आपल्या जीवनपद्धतीची रचना केलेली असल्यामुळे सर्व प्रकारची संकटे आपला पाठपुरावा करत राहणारच. या संकटमालिकांचा परिपाक म्हणजे आजची पर्यावरण - प्रदूषणाची समस्या होय. प्रचंड औद्योगीकरणामुळे होत असलेल्या नैसर्गिक संपत्तीचा र्हास, पाणी, हवा इत्यादी पर्यावरणीय घटकांचे वाढते प्रदूषण, स्वास्थ्याला हानीकारक ठरणार्या घातकद्रव्यातील वाढ, या केवळ पाश्चात्य, सम्रृद्ध देशांच्या समस्या राहिल्या नसून भारतासारखे देशसुद्धा यात भाजून निघत आहेत. जोपर्यंत आपण आपल्या भोवती आखून घेतलेली ही भांडवली चौकट मोडू शकत नाही, तोपर्यंत या समस्या राहणारच. कारण भांडवलीव्यवस्थेत उत्पादनावर मर्यादा म्हणजे एका प्रकारे व्यवस्थेची आत्महत्याच. अनिर्बंध उत्पादन, कृत्रिम गरजा व रोज एका नवीन बाजारपेठाचा शोध यावर भांडवली व्यवस्थेची सारी मदार आहे. यासंदर्भात लिमिट्स टु ग्रोथ या क्लब ऑफ रोमच्या 1975मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालाची साक्ष लेखकाने काढली आहे. "लोकसंख्या, उद्योगीकरण, प्रदूषण, अन्नधान्याचे उत्पादन आणि नैसर्गिक संपत्तीची हानी याबाबतीत जगभर जी वाढ होत आहे, तिची दिशा जर अशीच कायम राहिली तर येत्या शंभर वर्षाच्या आतच वाढीची अखेरची सीमा गाठली जाईल, परिणामी एकाएकी लोकसंख्या आणि औद्योगिक क्षमता यांची घसरण होण्याचा संभव राहील व ही घसरण थोपवून धरणे मानवी शक्यतेच्या बाहेर असेल. म्हणूनच प्रगतीची दिशा बदलणे आणि आर्थिक स्थैर्याची टिकावू स्थिती निर्माण करणे आवश्यक आहे" माणसाचे मोठेपण चारित्र्य व सद्गुणावर न ठरवता त्याच्या स्थावर-जंगम संपत्तीवरून ठरवणारी जीवनदृष्टीच भांडवली व्यवस्थेत अपेक्षित असते. नवनव्या 'गरजां'ची निर्मिती, ग्राहकांचा पिच्छा, व्यवहार करताना विधिनिषेधशून्यता, सूक्तासूक्ततेचा विचार न करण्याची वृत्ती, विलासप्रधान व चंगळवादी दृष्टीची लोकप्रियता या सर्व गोष्टी याच चौकटीत बसतात. मग त्यासाठी वाटेल ती किंमत देण्याची तयारी असते.
या चौकटीला पर्याय म्हणून साम्यवादाचा प्रयोगसुद्धा फसल्यातच जमा झाला आहे. ज्या क्रांतीच्या विचारसरणीने मानवजातीच्या इतिहासात एका नव्या, शोषणविरहित जीवनदृष्टीचे स्वप्न सर्वासमोर ठेवले ती इतकी अल्पजीवी ठरावी हे मानवजातीचे दुर्दैव म्हणावे लागेल. आर्थिक हलाखी, दैन्य, वंचितता, भ्रष्टाचार, उच्चपदस्थ व्यक्तींची ओंगळ जीवनशैली, हेच साम्यवादाचे व्यवहारातील फलित असेल तर, या तत्वज्ञानाचे पुन्हा एकदा सखोल मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे. लेखकाच्या मते साम्यवादी विचारातील अंगभूत उणीवाच यास कारणीभूत आहेत. काही व्यक्तींमुळे साम्यवादाचे विकृतीकरण झाले हा खुलासा पांढरीपांडे यांना समाधानकारक वाटत माही. कारम मुळातच व्यक्ती व विचारस्वातंत्र्याविषयी संदिग्ध भूमिका, मानवीमूल्यांचा लावलेला अर्थ, जनसामान्यापेक्षा पक्ष व पक्षकार्यकर्ता यांच्यावर भर इत्यादीमुळे साम्यवाद एका भोवर्यात सापडला व त्यातून बाहेर येणे अशक्य झाले.
साम्यवाद व भांडवलशाही यास पर्याय म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात नवभारताच्या जडणघडणीसाठी आपण सर्व चांगल्या घटकांचे मिश्रण करून एका मिश्रव्यवस्थेचा स्वीकार केला. लोकशाही-समाजवादी-धर्मनिरपेक्ष... अशा राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न पाहत असताना आज मात्र सर्व आघाड्यांवर निराशाच पदरी येत आहे. बेकारी, विषमता, दारिद्र्य व उपासमार यांना आपण हटवू शकलो नाही. विकास कार्यक्रमांमधून उत्पादनवाढ करणे शक्य झाले; परंतु त्याचा लाभ सधन व साधनसंपन्न लोकांनाच झाला. क्षेत्रीय असंतुलन वाढले. आतंकवाद, विभाजनवाद, आणि दहशतवाद यामुळे राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थिती भीषण स्वरूप घेत आहे. या परिस्थितीतून निर्माण झालेल्या ताणतणावांना आणि अंतर्विरोधांना पेलून धरण्यास लोकशाही असमर्थ ठरत आहे. तत्वहीन तडजोडी, वेळकाढूपणा व कचखाऊपणाचे धोरण यामुळे राजकीय असुरक्षितता व साशंकता वाढत आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण व गुन्हेगारांचे राजकारण यामुळे पूर्ण लोकशाही धोक्यात आली आहे. दलित आणि स्त्रियांवरील अत्याचार, वाढती जातीय तेढ, सांप्रदायवादाने धारण केलेले उग्र आणि आक्रमक रूप या गोष्टी स्वातंत्र्य, समता व सामाजिक-आर्थिक न्याय यांना मूठमाती देत आहेत.
आज स्वीकार केलेल्या सर्व वैचारिक व्यूहांमध्ये विज्ञान -तंत्रज्ञानाला फार महत्वाचे स्थान दिले जात असल्याने लेखकाने आधुनिक विज्ञानाने सांस्कृतिक मूल्यासंबंधी उभ्या केलेल्या आव्हानाबद्दल विस्तृतपणे चर्चा केली आहे. इंद्रियगम्य अनुभवांच्या आधारे आणि पुराव्यानिशी सिद्ध केले जाणारे ज्ञान हेच खरे ज्ञान, ही वैज्ञानिक परिभाषा लेखकाला मान्य नाही, असे वाटते.
मानव जातीच्या अनेक समस्यांचे मूळ त्याच्या विकासाच्या कल्पनेतसुद्धा आहे, असे लेखकाला वाटते. जीवनाचे साफल्य कशात शोधायचे? जीवनाचे उद्धिष्ट काय? मानव नेमके काय साधू इच्छितो? इत्यादी प्रश्नांना आपण काय उत्तर देतो यावर विकासाची संकल्पना अवलंबून रहायला हवी. केवळ भौतिक सोयी आणि सुविधा म्हणजेच विकास ही मानसिकता संपूर्ण समाधान देऊ शकणार नाही. अमर्याद उत्पादन, अनिर्बंध उपभोग, मोठाले औद्योगिक प्रकल्प, मोठाली शहरे, आणि हाय-टेक् जीवनशैली यांनाच विकास म्हणणे श्रेयस्कर ठरणार नाही. लेखकाच्या मते आपल्या आर्थिक व उत्पादन व्यवस्थेला, नीतीविचारांना आपले आंतरिक भावनिक जीवन व समाज-निसर्ग-पारलौकिक तत्व यांच्याशी असलेला त्यांचा संबंध आकार देत असतात. आधुनिक विकासाच्या संकल्पनेचे विवेक, विज्ञान-तंत्रज्ञाननिष्ठा, ऐहिकता व उपयोगितावाद हे प्रमुख घटक आहेत. त्यांतील विवेकवाद, विज्ञाननिष्ठा व ऐहिकता परस्परपूरक आहेत. या घटकांवर आधारलेला नवा समाज निर्माण करण्याची आग्रही भूमिका फुले, आगरकर व डॉ. आंबेडकर यांनी यापूर्वीच मांडली होती. मात्र यातील उपयोगितावाद (युटिलिटेरियनिझम) आपल्या जीवनदृष्टीला अगदी वेगळाच परिमाण देऊ शकतो. कारण उपयोग व उपभोग यात व्यावहारिक पातळीवर अंतर केला जात नाही. म्हणूनच अमर्याद उत्पादनाचे अर्थशास्त्र रूढ झाले. मर्यादित साधनसामग्रीमुळे या अर्थशास्त्राला आपोआपच मर्यादा पडू लागल्या. मग त्यातून शोषणव्यवस्था सर्वमान्य होत गेली. म्हणूनच विकासाच्या प्रचलित अर्थाचा व औचित्याचा गंभीरपणे पुनर्विचार करायला हवा व त्यासाठी वैचारिक परिवर्तन हवे, असे लेखकास सुचवावेसे वाटते.
गांधीविचारात इहवादाला राजनीतीचे अध्यात्मीकरण, विवेकवादाला अंतरात्म्याची हाक, विज्ञान-तंत्रज्ञानाला ग्रामोद्योग, संसदीय लोकशाहीला ग्रामराज्य असे अनेक पर्याय आहेत अशी लेखकाला खात्री पटली आहे. परंतु अनेकांना गांधीविचार नेहमीच प्रतिगामी वाटतात. गांधीच्या हयातीतच त्यांच्या कट्टर चाहत्यांनीसुद्धा अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. प्रातिनिधिक म्हणून नेहरू व टागोर यांच्या भूमिकेचा परामर्ष लेखकानी घेतला आहे. लेखकाच्या मते नेहरू व टागोर पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा प्रभाव असलेल्या प्रबोधनाच्या (एनलाइटनमेंट) परिघात राहूनच विचार करत होते. मात्र गांधीजींचा विचार व व्यवहार प्रबोधन विचासरणीच्या बाहेर जाऊन नवीन दृष्टी देतो. मूलगामी परिवर्तन हे गांधीजींचे उद्दिष्ट होते. स्पर्धा-शोषण-विषमताविरहित उत्पादनपद्धतीवर त्यांचा भर होता.
गांधी, नेहरू, टागोर यांच्या प्रबोधन विचारांपेक्षा सर्वस्वी वेगळी परंतु विश्वमानव संकल्पनेच्या अगदी जवळ पोचविणारी थोर मानवतावादी मानवेंद्र रॉय याच्याविचारसरणीचा आढावा लेखकानी विस्तृतपणे घेतला आहे. रॉय यांचे विचार अधिक सखोल व मूलभूत असे होते. भौतिकवाद, मानवतावाद आणि विज्ञानवाद यांच्या आधारावर त्यांनी नवमानवतावादाची उभारणी केली. 'सर्व गोष्टींचा अखेरचा मापदंड माणूस आहे' हे त्यांच्या मानवतावादाचे मूलभूत तत्व होते. मग आज गांधीवाद कालबाह्य झाला आहे काय? असा प्रश्न लेखक विचारू इच्छितात. एखादी विचारसरणी संकटांना कशी तोंड देउ शकते यावरच त्याची प्रस्तुतता ठरत असते. एकंदर परिस्थितीचा विचार करता गांधीविचारांखेरीज दुसरा तरणोपाय नाही, या निष्कर्षापर्यंत लेखक पोचतात.
प्रस्तावनेत उल्लेख केल्या प्रमाणे, संपूर्ण पुस्तक वाचताना लेखकाचा कल गांधी विचारांकडेच झुकलेला आहे, हे आपल्या लक्षात येते. लेखकाने आपली विचारदिशा ठरविताना उल्लेख केलेले संदर्भ व त्यातून काढलेले निष्कर्ष कितपत प्रस्तुत आहेत याचा विचार करावा लागेल. उदाहरणार्थ, लिमिट्स टु ग्रोथ या पुस्तकाचा संदर्भ जागोजागी दिला आहे. परंतु या पुस्तकातील अनेक उणीवा 25 वर्षानंतर केलेल्या एका अभ्यासात अधोरेखित केल्या आहेत. मुळात हे पुस्तक mathematical analysis and simulation studies चा गोषवारा आहे. अशा प्रकारच्या विश्लेषणात्मक अभ्यासात अनेक गृहितकांचा समावेश असतो. त्यातील एखादे जरी अपूर्ण ठरले तरी संपूर्ण ढाचा कोसळतो.
जगबुडीचे भविष्यवेध घेण्याचे अनेक प्रयत्न यापूर्वीही झालेले आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानावर अनेक दोषारोप झालेले आहेत. आधुनिक विचारपद्धती, लोकशाही, समाजवाद यावरही तिरस्कारयुक्त नजरेने पाहणारे अनेक आहेत. परंतु सर्वसमावेशक असा ठोस पर्याय अजूनही कुणी समोर ठेवला नाही. जगातील अर्ध्या-अधिक लोकांच्यापुढे अन्न, पाणी, आरोग्य, शिक्षण या दैनंदिन समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे त्यांना इतर कुठलेही दूरगामी विचार जवळचे वाटत नाहीत. बदलत्या संदर्भात आज कुठलाही इझम आपले संपूर्ण समाधान करू शकत नाही. त्यात गांधीझमचाही समावेश आहे.
तरीसुद्धा सर्व मानवजातीला कवेत घेणारा, जीवन व्यवहाराशी अत्यंत जवळीक असणारा, जनसामान्यांना आत्मसन्मानाने वागविणारा गांधीवाद आपल्याला भावणारा आहे. गांधीवादाकडे अनेक समस्यांचे उत्तर असून त्याची योग्य कार्यवाही करणे हाही एक उपाय करून बघायला हवे, हे लेखकाचे म्हणणे आपल्याला थोड्या विचारांती पटू लागते.
अन्वय
सु श्री पांढरीपांडे
प्रतिमा प्रकाशन, पुणे (1995)
किंमत: 80 रु
छान
छान. जगबुडी गांधीवाद यावरील लेखकाचे विचार रोचक आहेत.
>>मर्यादित साधनसामग्रीमुळे या अर्थशास्त्राला आपोआपच मर्यादा पडू लागल्या. मग त्यातून शोषणव्यवस्था सर्वमान्य होत गेली. म्हणूनच विकासाच्या प्रचलित अर्थाचा व औचित्याचा गंभीरपणे पुनर्विचार करायला हवा व त्यासाठी वैचारिक परिवर्तन हवे, असे लेखकास सुचवावेसे वाटते
कळीचा मुद्दा आहे. पण हीच शोषणव्यवस्था हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे, असे नाही का ?
अवांतरः मागच्या आठवड्यात कम्युनिझम, या आठवड्यात गांधीईझम पुढल्या आठवड्यात सावरकर का ? :)