का वाचता येत नाही?

Submitted by कविता महाजन on

आपण काय वाचतो, का वाचतो, किती-कसे-कुठे वाचतो? ......... याविषयी आपण नेहमीच सांगतो - बोलतो -लिहितो. पण काही वेळा विपरित असतात आणि आपल्याला 'वाचणे' जमत नाही. किंवा ज्यांना जमत नाही अशी माणसं आपल्या भवताली दिसतात कधीमधी. हे अनुभव आपण इथे शेअर करूया का? नकारात्मक अनुभव सांगायला एक खास मोकळेपणा असावा लागतो आणि धाडसही! हे माहीत आहे. तरी हा प्रश्न विचारते आहे.
माझी एक लेखक मैत्रीण आहे. तमीळ भाषेत ( टोपणनावानं ) लिहिणारी मुस्लीम लेखिका आहे. ( आमचा संवाद भयंकर विनोदी असतो. फोन केला तर ती एक शब्द, मी एक शब्द असे अडखळत बोलतो. कारण तिला मराठी, हिंदी, उर्दू अजिबात येत नाही. आणि इंग्लीशमधील जुजबी शब्द माहीत आहेत. माझेही इंग्लीशचे ज्ञान अगाध आहे... आणि मला तमीळ अजिबातच येत नाही.) तिला लग्नानंतर "काहीही वाचायचे नाही" असे सांगण्यात आले... लिहिण्याचा तर मग प्रश्नच नव्हता. दुसरे टोकाचे उदाहरण एका उच्चशिक्षित मैत्रिणीचे. तिने हाती पुस्तक धरले की नवर्‍याचे टोमणे सुरू होतात. अकारण. हे झाले बायकांचे. पुरुषांचेही फार वेगळे नाही. मुलं वाचत असलेली पुस्तकं फाडून टाकणारे बाप माहीत आहेत. "फारसं न कमावता" किंवा "घरात वेळ देण्याऐवजी" पुस्तकं वाचत बसलेल्या नवर्‍यांवर डाफरणार्‍या बायका माहीत आहेत. ही कौटुंबिक कारणं झाली. इतर अनेक कारणं आहेत... त्यांविषयी बोलावे असे वाटतेय...

मला वाचायची आवड लागण्यामागे कुटुंबातील काहिंचा हात असला तरी कुटुंबातच प्रत्येकाला वाचायची आवड आहे असे नाही. शिवाय मित्रमंडळींपैकी किंवा इतर परिचितांमधेही वाचन करणारे कमीच दिसतात.
मी वेळात वेळ काढून वाचतो त्यामुळे मला वाचता का येत नाही हे सांगता येणार नाही.. मात्र इतरांनी दिलेली काहि कारणे सांगतो:
वैयक्तिक:
१. कंटाळा / बैठकीचा अभाव
२. अज्ञानः काय वाचायचे हेच माहित नसते. जे चुकून वाचले जाते ते न आवडल्याने वाचनाकडे दुर्लक्ष
३. वाचताना झोप येते
४. वाचन आवडते तर खरे (आवडायचे पुर्वी) मात्र आता वाचन करणार्‍यांकडे शिष्ट म्हणून बघितले जाते. मला तशी इमेज नकोय (हा एकाचा दृष्टीकोन आहे, माझे मत नाही -- प्रतिसादांचा भडिमार करू नये :) )
५. हल्ली पूर्वीसारखे लिहिणारे राहिलेत कुठे? (ही पळवाट - या व्यक्तींनी पुर्वीचे वाचले असते असेही नव्हे-- मुळ कारण १ असते)

ही वैयक्तीक कारणे झाली. कौटुंबिक कारणे बघायची तर अशी देता येतीलः
पाल्यांना पुस्तके न वाचता येण्याची कारणे:
१. लहानपणापासून गोष्टीचे(किंवा कोणतेही नॉन-अ‍ॅकॅडेमिक) पुस्तक पाल्याच्या हातात दिसले की ओरडणे.
२. पालकांचे सतत टिव्ही बघणे, संवादाचा अभाव
पालकांना पुस्तके न वाचता येण्याची कारणे:
१. वाचन आवडत असूनही मुलांच्या मागे आपला पूर्ण वेळ घालवणे (अवांतरः म्हणजे मुलांना शिकवण्यात नव्हे तर त्यांची कामे करून त्यांना परावलंबी बनविण्यात :) )
२. कार्यालयीन कामे व कुटुंब यांत समतोल साधता न येणे.

सामाजिक स्तरावरची कारणे बघावीत तरः
१. जागोजागी गरज असलेल्या उत्तम वाचनालयांचा अभाव
२. पुस्तकांच्या किंमती
३. राजकीय कारणे (पुस्तकावर बंदी, पुस्तके जाळणे)
४. धार्मिक / सामुदायिक कारणे (कोणीतरी सांगितलं आहे की हे वाचुन नका, माझ्या गुरुंबद्दल/जातीबद्दल/धर्माबद्दल हा लेखक काहिहि लिहितो, बहिष्कार टाका वगैरे वगैरे)

अजूनही बरीच आहेत.. लोकं कधीकधी तर काहिहि कारणे देतात, तर काहि विचित्र असली तरी खरी असतात. आठवतील तशी या धाग्यावर देईनच

Mon, 11/04/2011 - 11:36 Permalink

सांप्रत काळातील स्वानुभवावरून सांगतो. वाचता येत नाही, याची बहुतांश कारणे पळवाटा असतात. बाकी काही नाही. खरे कारण एकच असू शकते - वाचनाची आवड नाही.
(ही माझी मते आहेत, काहींना किंवा अनेकांना नामंजूर असतील. कृपया सवाल जवाब नकोत. हां, हे मत भंपक आहे वगैरे तुमची मते जरूर मांडा. हरकत इल्ले...)

Mon, 11/04/2011 - 22:42 Permalink

खरे आहे. मी का वाचत नाही याची माझे मन भराभर अक्षरशः शेकडो उत्तरे बनवुन देते. पुस्तके विकत घ्यायला आनंद वाटतो, मागच्या वर्षभरात १०-१५ पुस्तके सहज घेतली असतील, वाचली किती ? मला इतर गोष्टींपेक्षा पुस्तक वाचणे कमी आवडते की काय या निष्कर्षाप्रत मी येउन पोहचीन असे वाटते. पण मी आधीपासूनच असा आहे का ? याचे उत्तर देतांना मला दिलासा मिळतो आणि मी पुन्हा या ब्लॉकमधुन बाहेर पडेन असा विश्वास सुखावुन जातो.

Mon, 11/04/2011 - 23:50 Permalink

म्हणूनच माझ्या यादीत पहिले कारण 'कंटाळा' दिले आहे :)
बाकी ही चर्चा, ज्यांना पुस्तके वाचायची इच्छा / आवड आहे त्यांना पुस्तके का वाचता येत नाहीत? (किंवा निदान काय कारणे ऐकायला मिळतात) असा असावा (नसल्यास करावा :) )असे वाटते.

बरीचशी कारणे पळवाटा असल्या तरी काही कारणे प्रत्यक्षात खरी असतात. (विषेशतः बाहेरून होणारी 'जबरदस्ती' इन्व्हॉल्व्ह असणारी कारणे -- पालकांनी मुलांवर, समाजाने लेखकांवर वगैरे वगैरे)

Tue, 12/04/2011 - 08:47 Permalink

  • खूप वाचणार्‍या आई-वडिलांचं मूल त्या व्यवस्थेविरुद्ध निव्वळ एक प्रकारची बंडखोरी म्हणून वाचत नाही असा प्रकार मी पाहिला आहे.
  • जगण्यातल्या मानसिक ताण-तणावांपासून दूर पळण्यासाठी केवळ थिरकत्या रंजक गोष्टींमागे लागणारे आणि रोजचं वर्तमानपत्रसुद्धा न वाचणारे अनेक पाहिले आहेत.
  • वाचणारे लोक 'इंटुक'* असतात आणि असल्या 'विचारजंती' लोकांची अ‍ॅलर्जी आहे म्हणून न वाचणारेसुद्धा पाहिले आहेत.

* - 'इंटुक' म्हणजे काय याविषयी अधिक जाणण्यासाठी वाचा: 'गार्बो' - महेश एलकुंचवार

Tue, 12/04/2011 - 14:20 Permalink

मला काही साहित्यप्रकार तितकेसे रुचत नाहीत त्यामुळे निव्वळ तशाच प्रकारची पुस्तके अवतीभवती आहेत आणि मला हवासा पर्याय उपलब्ध नाही म्हटले की मला वाचता येत नाही!

वाचन करताकरता गप्पांशी सुसंबद्ध बोलणे वा ऐकणे मला अजिबात जमत नाही त्यामुळे - ही खरंतर बडबडी व्यक्ती आहे पण जळ्ळ्या मेल्या तिच्या हातातल्या त्या पुस्तकामुळे ती खुलून बोलत नाही - असा समज करून घेणार्‍या जीवाभावाच्या व्यक्तींसोबत असताना मला वाचता येत नाही! जेव्हा मला स्वतःला भरभरून बोलायचे असते तेव्हा त्यांच्या वाचनाबद्दल माझीही अशीच भावना होते कधीकधी, हेही मी नाकारत नाहीच म्हणा.

काहीकाही जण अगदी पार आंघोळीच्या वेळीही पुस्तक टांगून वाचतात म्हणे! क्षमस्व, पण रोजमर्राचे जीवनावश्यक विधी आणि ऑफिसमधली कामे करताना मला वाचता येत नाही!

लाईट गेल्यावर लॅप्टॉप/विजेरी/मोबाईलची बॅटरी संपल्यास मला वाचता येत नाही.. अर्थातच रात्री!

आजूबाजूचे वातावरण स्वच्छ नसल्यास मला वाचता येत नाही!

काही वयस्कर दोस्तांना वयापरत्वे वाचायला जमत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे एखाद्या पुस्तकाची वाहवा केली की ते पुस्तक वाचून दाखव अशी विनंतीवजा आज्ञा आलीच म्हणून समजायचे. अशा आज्ञेचे पालन करायला मला अतीव आनंद होतो पण अशा वाचनात मध्येच ओघाओघानेच का असेना पण चर्चा वा गप्पा सुरू झाल्यास मला मग पुढे वाचता येत नाही!

अजून लिहावाचायला शिकायचे असलेल्या बालदोस्तांना एखादे गाणी/गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवत असताना मी वाचत असते त्या पानावरचे चित्र पहायला त्यांचा जीव जात असल्याने त्यांना मांडीवर स्थानापन्न केल्याशिवाय मला वाचता येत नाही! अर्थात मांडीवर बसवून घेतल्यावरही मी सांगतेय त्यापेक्षा जास्तीचे असे काही अमोघ ज्ञान त्या चित्रातून त्यांना समजल्याने मान १८० अंशात वळवून ते ज्ञान माझ्यापर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे काम सुरू झाले की मगदेखील मला वाचता येत नाही!

Tue, 12/04/2011 - 22:12 Permalink