जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित, लेखक तसेच बौद्ध धर्माच्या अभ्यासामुळे ‘त्रिपिटकाचार्य’ या गौरवाने सन्मानित झालेले राहुल सांकृत्यायन यांचा जन्म ९ एप्रिल १८९३ रोजी झाला. लहानपणापासून विरक्त वृत्तीचे. तेव्हा साधू बनण्यासाठी काशी गाठले. तेथे संस्कृतचा अभ्यास केला. या काळात ते आर्य समाजाकडे वळले. नि:स्वार्थी वृत्तीच्या हिंदू मिशनऱ्यांची संघटना उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. १९१७ मध्ये रशियात झालेल्या क्रांतीने ते प्रभावित झाले. ‘साम्यवाद ही क्यों’, ‘मानवसमाज’, ‘राजनीती’ हे ग्रंथ लिहिले. श्रीलंकेत १९३०च्या सुमारास बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि मूळचे केदारनाथ पांडे दीक्षा घेतल्यावर राहुल सांकृत्यायन झाले. यानंतर बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी नेपाळ, तिबेट, ब्रह्मदेव, जपान, कोरिया अगदी युरोपही पालथा घातला. रशियात काही काळ प्राध्यापकी केली. तेथे एलेना या स्त्रीशी त्यांनी विवाह केला. पाली, संस्कृत, अर्धमागधी या प्राचीन भाषांसह इंग्रजी, अरबी, फार्सी, फ्रेंच, तामिळ, कन्नड, चिनी, जपानी, तिबेटी, रशियन इ. भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. साम्यवाद व बौद्ध तत्त्वज्ञान या दोघांची सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धम्मपट, विजयपिटक या बौद्ध ग्रंथांचा हिंदी अनुवाद, तुरुंगात असताना ‘व्होल्गा से गंगा’ हा कथासंग्रह, याशिवाय ‘मेरी साधक यात्रा’, ‘तिब्बत मे सवा वर्ष’, ‘मेरी युरोप यात्रा’ ही प्रवासवर्णनं, ‘सतमी के बच्चे’, ‘बहुरंगी धपुरी’ या कथा तर ‘जीने के लिए’, ‘जय योधेय’ या कादंबऱ्या ही त्यांची ग्रंथसंपदा. याशिवाय धर्म, तत्त्वज्ञान, राजनीती, इतिहास, पुराण, प्राच्यविद्या, व्याकरण, विज्ञान, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, नाटक आदी विषयांवर दीडशेच्या वर त्यांनी ग्रंथ लिहिले. वैदिक हिंदू धर्म ते आर्यसमाज तेथून साम्यवाद ते बौद्ध धर्म आणि शेवटी मानवता हाच धर्म असा त्यांचा थक्क करणारा वैचारिक प्रवास. हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सन्मानित डॉक्टरेट, पद्मभूषण आदी मानसन्मान त्यांना मिळाले. १४ एप्रिल १९६३ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.