रणरागिणी

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पुरूषांच्या बरोबरीने किंबहुना काकणभर अधिकच सहभाग स्त्रियांचा होता. स्वातंत्र्य आंदोलनात जेवढ्या स्त्रिया सहभागी झाल्या त्यापेक्षा अधिक स्त्रियांनी महाराष्ट्र निर्मितीच्या आंदोलनात भाग घेतला. एस.एम. जोशींनी म्हटले होते की, ’पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक सहभाग स्त्रियांचा होता’. एवढेच नव्हे तर हे आंदोलन अहिंसात्मक पद्धतीने जिवंत ठेवण्याचे कार्य या महिलांनीच केले.

मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीचे नितांत सुंदर स्वप्न पहात, सा-या सामाजिक, मानसिक बंधनांना उल्लंघून, लाठी - काठी-बंदूक-तुरूंग कशाचीही तमा न करता या सा-या आंदोलनाला जिवंत आणि ज्वलंत ठेवण्याचे काय केलेल्या हजारे, लाखो ज्ञात-अज्ञात भूमिकन्यांनी एक इतिहास घडवला. ’संयुक्त महाराष्ट्र’ निर्माण झाला. एक संपूर्ण स्वातंत्र्य यंत्रणा महाराष्ट्रभर महिलांनी चालविली. अत्यंत आश्‍चर्यकारक इतिहास या महिलांनी घडविला. परंतु दुर्दैवाने हा इतिहास गेल्या पन्नास वर्षात पुढे आला नाही.

असंख्य कार्यक्रम, सत्याग्रह, मोर्चे, तुरूंगवास या सगळ्या घटनांनी परिपूर्ण असा हा इतिहास सर्व मराठी माणसांना अभिमान वाटावा असा आहे. गेली पन्नास वर्षे अंधारात राहिलेला हा इतिहास या पुस्तकाच्या रूपाने मनीषा पाटील यांनी महाराष्ट्राच्या विविध भागात व सीमा भागात फिरून, आंदोलक महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन, समकालीन लोकांना भेटून, जुन्या कागदपत्रांच्या आधारे एकत्रित केला आहे. साधारणपणे ९० महिलांची सविस्तर माहिती आणि त्याखेरीज शंभर-सव्वाशे महिलांचे नामोल्लेख या पुस्तकात आहेत.

भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली
किंमत
200.00
पृष्ठसंख्या
226